सांगलीत अभियंत्याचे घर फोडून 34 तोळे सोने लंपास चोरट्याविरोधात गुन्हा; परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू.
सांगलीत अभियंत्याचे घर फोडून 34 तोळे सोने लंपास चोरट्याविरोधात गुन्हा; परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासणी सुरू.
--------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
--------------------------------------
सांगली : शहरातील वानलेसवाडी येथील अभियंत्याच्या घरात किचनचा दरवाजा फोडून आत प्रवेश करीत चोरट्याने रोख रकमेसह सुमारे 34 तोळे सोन्याचे दागिने, असा 12 लाखांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना वानलेसवाडी येथील हायस्कूल रोडवरील समाधान चौक परिसरात शनिवारी मध्यरात्री घडली. याबाबत संजीव विश्वनाथ नागोरे यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संजीव नागोरे हे इलेक्ट्रॉनिक्स अभियंता आहेत. त्यांचे वानलेसवाडीतील समाधान चौकात घर आहे. पत्नी आणि तीन मुलांसह ते येथे राहतात. शनिवार, 15 रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सर्वजण घरात हॉलमध्ये झोपले होते. मध्यरात्री चोरट्याने घराच्या पाठीमागील बाजूने किचनच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. नागोरे कुटुंबीयांना चाहूल लागू न देता कपाटाचा दरवाजा उघडून आतील लॉकर उचकटला. त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. त्यानंतर कपाटाजवळ असलेल्या लोखंडी कपाटातील रोख 26 हजार रुपये घेतले. हँगरला अडकवलेल्या पॅन्टमधील पाच हजार रुपये घेऊन चोरट्याने पलायन केले.
पहाटे साडेतीनच्या सुमारास नागोरे यांना जाग आली असता चोरीचा प्रकार निदर्शनास आला. त्यांनी विश्रामबाग पोलिसांना चोरीची माहिती दिली. कपाटातील सोन्याची अंगठी, सोन्याची वेगवेगळ्या वजनाची वेढण, बदाम, दावणगिरी पाटल्या, कानातील वेगवेगळ्या बाली, बंगाली पेन्डंट, इंद्रजित चेन, टॉप्स जोड व वेल जोड, मुडी रिंग व फॅन्सी खटका रिंग जोड, बंगाली अंगठी, नक्षीदार बिलवर दोन जोड, कानातील लटकन जोड, राजकोट खटका रिंग, बटरफ्लाय चेन, असे 34 तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक चेतन माने करत आहेत.
Comments
Post a Comment