वाचनाने माणूस समृद्ध होतो - प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे.

 वाचनाने माणूस समृद्ध होतो - प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे.

---------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

---------------------------------- 

वाई, ता. ८ : वाचन हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. वाचनाने माणूस समृद्ध होतो. मानवी जीवनाचा परमानंद घेण्यासाठी 'वाचाल तर वाचाल' हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सुविचार प्रत्येकाने अनुभवायला हवा, असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) सुभाष वाघमारे यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात 'वाचन संकल्प महाराष्ट्राचा' अभियानांतर्गत ‘वाचन कौशल्य : तंत्र व विकास’ या कार्यशाळेतील दुसऱ्या व्याख्यानात ते वाचनसंस्कृती जोपासण्याची कारणे आणि उपाय या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य व मराठी विभागप्रमुख प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, श्री. भीमराव पटकुरे, बाळासाहेब कोकरे, ज्येष्ठ प्राध्यापक (डॉ.) सुनील सावंत, प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे, प्रा. (डॉ.) विनोद वीर, ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे, डॉ. धनंजय निंबाळकर,  डॉ. संग्राम थोरात यांची उपस्थिती होती.

डॉ. वाघमारे म्हणाले, वाचन कौशल्य वाढविल्यास व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. वाचनामुळे जगातील अनेक गोष्टींचे ज्ञान मिळते. ग्रंथ हे ज्ञानाची गंगोत्री आहे. माणसामध्ये स्वाभिमान, आत्मविश्वास, सत्याची चाड ही वाचनामुळे निर्माण होते. काय वाचावे हे योग्य वेळी समजणे आवश्यक आहे. जीवनात बदल घडविण्याचे सामर्थ्य वाचनामध्ये असते. विद्यार्थ्यांनी सोशल मिडीयाचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी केला पाहिजे. प्रत्येक लेखक आपल्या ग्रंथातून काहीतरी चांगला संदेश देत असतो. त्याचा शोध घेऊन प्रत्येकाने तो विचार आचरणात आणला पाहिजे.  दलित साहित्याच्या वाचनाने आत्मभान जागृत होते. संतांनी, समाजसुधारकांनी समानतेच्या दिलेल्या मंत्राचा अंगीकार करुन जीवन जगायला हवे. त्यांच्या रस्त्यावरुन चालताना आपली सद्सदविवेक बुध्दी जागृत ठेवण्यासाठी वाचनाची नितांत गरज आहे, कारण वाचन हे जीवन आहे. त्यांनी आपल्या भाषणातून वाचनसंस्कृतीचे महत्त्व, ती वृद्धिंगत करण्याचे उपाय, उद्देश, वाचनसंस्कृतीच्या ऱ्हासाची कारणे उदाहरणांसह विशद केली.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, वाचनाने माणूस स्वयंप्रकाशित होतो. ग्रंथांमध्ये जीवनानुभव असतात त्याचा शोध घेता आला पाहिजे. ज्ञान आणि प्रेम यांचा संयोग व्यक्तीच्या अंगी असला पाहिजे. माणसाचे विचार चांगले असतील तर ती व्यक्ती माणूस म्हणून मोठी ठरते. आपली वाटचाल योग्य दिशेने होण्यासाठी समाजज्ञान आणि समाजभान असणे आवश्यक आहे. वाचनाचा संस्कार माणसाला प्रगल्भ बनवतो. निरंतर वाचनाने शब्दभांडार वाढते. समाजात बोलताना व वागताना अंगी नम्रता येते. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये प्रा. डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. डॉ. संग्राम थोरात यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. शिवाजी कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे यांनी परीश्रम घेतले.

कार्यक्रमास डॉ. मंजुषा इंगवले, डॉ. बाळकृष्ण मागाडे, डॉ. अंबादास सकट, डॉ. संदीप वाटेगावकर, दीपाली चव्हाण, संदीप पातुगडे, तानाजी हाके, सोमिनाथ सानप, नीलम भोसले, रेश्मा मुलाणी, दीक्षा मोरे, मेघा शिर्के, सुलभा घोरपडे,  जितेंद्र चव्हाण व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.