प्राचार्य डॉ. फगरे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
प्राचार्य डॉ. फगरे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.
----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
वाई : दि. ४ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ जोतिबा फगरे यांना धुळे येथील नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम भारत सरकार या संस्थेने क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले आदर्श प्राचार्य हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या प्राचार्यांना हा पुरस्कार दिला जातो. प्राचार्य डॉ. फगरे यांचे शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार देण्यात आला आहे. महात्मा जोतिबा फुले यांनी देशातील महिला व बहुजन समाजाला शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिलेत. या महामानवाच्या कार्याची प्रेरणा घेऊन शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम प्राचार्य डॉ. फगरे यांनी केले आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करत असताना बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. आपल्याला मिळालेल्या पुरस्काराने आपली जबाबदारी वाढली असल्याची त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मदनदादा भोसले, उपाध्यक्ष मा. शंकरराव गाढवे, सचिव डॉ. जयवंत चौधरी, खजिनदार प्रा. नारायण चौधरी सर्व संचालक महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment