नेताजी सुभाषचंद्र बोस थोर क्रांतीकारक नेते होते : - डॉ.सोपान शेंडे.

नेताजी सुभाषचंद्र बोस थोर क्रांतीकारक नेते होते : - डॉ.सोपान शेंडे.

---------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

---------------------------------- 

वाई: ‘आझाद हिंद सेना’ स्थापन करून सुभाषचंद्र बोस यांनी देशाच्या स्वातंत्र्यात मोठे योगदान दिले आहे, त्यांच्या जयंतीदिनी सर्व भारतीयांनी स्मरण करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पुणे येथील सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक डॉ.सोपान शेंडे यांनी केले.जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत इतिहास,राज्यशास्त्र विभाग,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.(डॉ.) ज्ञानदेव झांबरे होते. या प्रसंगी कला विभागाचे उपप्राचार्य प्रा.(डॉ.) चंद्रकांत कांबळे,अग्रणी महाविद्यालयाचे समन्वयक व वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. भिमराव पटकुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आपल्या व्याख्यानात डॉ.शेंडे पुढे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस व त्यांच्याविषयी होणारे प्रतिमाकेंद्रित राजकारण यामुळे त्यांचे जीवनचरित्र व क्रांतिकारी विचार झाकोळले आहेत.बोस यांचे कुटुंब साधन व सुसंस्कृत होते. त्यांच्या घराण्यातील बावीस पिढ्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ते आय.सी.एस.सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण होते, परंतु प्रखर राष्ट्रभक्ती व क्रांतिकारी विचार यामुळे ते स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. १९२१ मध्ये इंग्लडमध्ये प्रशासकीय पदाचा राजीनामा देऊन ते भारतात आले व म.गांधीजीच्या असहकार चळवळीत सामील झाले. ‘तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूँगा’ या त्यांच्या घोषणेमुळे भारतीय स्वातंत्र्य चळवळीला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली. अबू हसन या जहाज व्यापाऱ्याने आपली सर्व संपत्ती आझाद हिंद सेनेला दान देऊन स्वातंत्र्य चळवळीत सक्रियपणे सामील झाले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारतीय भूमीवर आझाद हिंद सेनेने तिरंगा फडकविला. भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ते जीवनाच्या अखेरपर्यंत लढत राहिले. 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्रा. (डॉ.) झांबरे म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस हे उच्च विद्याविभूषित व सुसंस्कृत नेतृत्व होते. आज भारताची जी प्रगती दिसते आहे, त्यामागे अशा क्रांतिकारकाचे मोठे योगदान आहे. कलकत्त्याचे महापौर असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. 

                कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभागप्रमुख डॉ. भिमाशंकर बिराजदार यांनी केले. प्रास्ताविकेत नेताजींच्या विविधांगी पैलूंचे समकालीन महत्त्व विचारात घेऊन संशोधन करणे गरजेचे आहे, असे सांगितले. पाहुण्यांचा परिचय श्री. सुरज यादव यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुमंत सावंत यांनी केले, तर आभार श्री.विनायक कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्य प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.