'अमृता'हूनी गोड नाम तुझे 'देवा' रोहित पाटलांची विधानसभेत टोलेबाजी : एक नंबरवरील वकीलाप्रमाणे माझ्याकडेही लक्ष असुद्या.

 'अमृता'हूनी गोड नाम तुझे 'देवा' रोहित पाटलांची विधानसभेत टोलेबाजी : एक नंबरवरील वकीलाप्रमाणे माझ्याकडेही लक्ष असुद्या.

----------------------------------------

 मिरज तालुका प्रतिनिधी

 राजू कदम

-----------------------------------------

        विधानसभा निवडणुकीनंतर पहिलेच विशेष अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर अभिनंदनपर भाषणात आमदार रोहित पाटील बोलत होते. देशातील सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून विधानसभेत 'एन्ट्री' केल्यानंतर रोहित पाटील यांनी आपले पहिलेच भाषण गाजवले. भाषणात टोलेबाजी करून सभागृहात हशा पिकवला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्वच आमदार रोहित पाटील यांचे भाषण ऐकतच राहिले.


     विधानसभेतील आपल्या पहिल्या भाषणात आमदार रोहित पाटील म्हणाले, आपल्या देशाने अनेक शाह्या बघितल्या आहेत. मात्र लोकशाही ही अत्यंत महत्त्वाची शाही आपल्या देशाच्या वाटणीला आली. सबंध जगामध्ये आपला देश स्वतःचे वेगळेपण टिकवू शकला त्याचं कारण म्हणजे लोकशाही होय. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येकाला एक मताचा अधिकार दिला आहे. या अधिकारातूनच आपण सर्वजण इथे बसलो आहोत.


       विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना उद्देशून आमदार रोहित पाटील म्हणाले, आपण जसे सर्वात तरुण अध्यक्ष होण्याचा मान मिळवला आहे, त्याच पद्धतीने मीही सर्वात तरुण सदस्य म्हणून विधिमंडळात बसण्याचा मान मिळवला आहे. त्यामुळे तरुण अध्यक्ष म्हणून तुम्ही सर्वात तरुण सदस्याकडे बारीकपणाने लक्ष द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. तुम्ही निष्णात वकील आहात. मीही वकिली पूर्ण करतोय. एक नंबर बाकावर बसलेल्या वकिलाकडे जसे आपले लक्ष असते, तसेच याही वकिलाकडे आपण लक्ष द्यावे.


       या सदनाची गरिमा राखत असताना अध्यक्ष म्हणून आपण विरोधी पक्षावरही लक्ष द्यावे. विरोधकांकडून सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या मागण्या होतील त्या मान्य कराव्यात. पूर्ण कराव्यात. त्याबाबतीत आपण आम्हास न्याय द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो.


       मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून आमदार पाटील म्हणाले, संत तुकारामांच्या वाणीतून 'अमृता'हुनी गोड नाम तुझे 'देवा' असा अभंग आलेला आहे. संतांच्या वाणीतूनही आपलं नाव गोड पद्धतीने घेतलं गेलं आहे. त्यामुळे पुढच्या काळात काम करत असताना तुम्ही विरोधी पक्षाला गोड पद्धतीने वागणूक द्याल, अशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण विरोधी पक्षाला येत्या काळात सहकार्य करावे, अशीही विनंती करतो.


       ते म्हणाले, विधानसभेत अनेक समित्या गठीत केल्या जातात. त्याच्या माध्यमातून चांगले काम व्हावे, अशी अपेक्षा आहे. अधिवेशनादरम्यान अनेक आश्वासने दिली जातात. मात्र नंतरच्या काळात ही आश्वासने पूर्ण होत नाहीत, असे दिसून येत आहे. त्यामुळे आश्वासन समितीच्या माध्यमातून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत. याशिवाय विधिमंडळात चांगले कायदे तयार व्हावेत. तरुणांना अपेक्षित असणारा नवमहाराष्ट्र घडवत असताना 21 व्या शतकात अभिप्रेत असणारे कायदे या विधिमंडळात तयार व्हावेत.


*फडणवीसांनी राहुल नार्वेकरांना दिल्लीला पाठवायला हवं होतं : आ. पाटील*


      विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आजपर्यंत अनेकांनी चांगलं काम केलं आहे. अगदी 1937 मध्ये डॉ. स्व. मावळकर यांनी विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केलं होतं. नंतरच्या काळात त्यांना लोकसभेचे अध्यक्ष बनविण्यात आले. राहुल नार्वेकर यांनीही गेल्या काही वर्षात विधानसभेचे अध्यक्ष म्हणून अतिशय चांगलं काम केलं आहे. त्यामुळे परंपरेप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नार्वेकर यांना दिल्लीला पाठवायला हवं होतं, असा मिश्किल टोला आमदार रोहित पाटील यांनी विधानसभेत लगावला .

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.