किसन वीर’ मध्ये पारंपरिक वेशभूषा दिन संपन्न राष्ट्रीय सेवा योजना व महिला सक्षमीकरण विभागाचा उपक्रम

 ‘किसन वीर’ मध्ये पारंपरिक वेशभूषा दिन संपन्न

राष्ट्रीय सेवा योजना व महिला सक्षमीकरण विभागाचा उपक्रम.

-------------------------------
 वाई प्रतिनिधी कमलेश ढेकाणे -

-----------------------------------

वाई, ता. ०४ : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना व महिला सक्षमीकरण विभाग यांच्या वतीने शारदियनवरात्रोत्सवानिमित्त प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपरिक वेशभूषा दिन संपन्न झाला. कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, महिला सक्षमीकरण विभागाच्या समन्वयक डॉ. मंजुषा इंगवले व  श्रीमती दीपाली चव्हाण यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.

याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे, कला विभागाचे उपप्राचार्य व एन. एस. एस. चे सल्लागार प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य  श्री.भीमराव पटकुरे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. हणमंत कणसे, डॉ. मृणालिनी वाईकर यांची उपस्थिती होती.

डॉ. मंजुषा इंगवले म्हणाल्या, शारदियनवरात्रोत्सवात आपण अष्टभुजा देवीच्या मूर्तीची पूजा करतो. या निमित्ताने साडेतीन शक्तीपीठांना स्मरून त्यांच्याठिकाणी असणारी उर्जा घेण्याचा प्रयत्न करतो. नऊ दिवस, नऊ रंग यांच्या माध्यमातून आपण वातावरणातील पंचमहाभूताना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. पृथ्वी, आकाश, जल, वायू व अग्नी यांच्या ठिकाणी असणारे तत्व मानवास समृद्ध करते.  हिरवा रंग निसर्गतत्व, निळा रंग आकाशतत्व आपल्यात रुजवते याची या शारदियनवरात्रोत्सवानिमित्त अनुभूती घेऊयात, असे आवाहन त्यांनी केले.

एन. एस. एस. चे सल्लागार प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे म्हणाले, आज आपण पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करीत आहोत व कालच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हा दुग्धशर्करा योग आहे.  आजच्या २१ व्या शतकात आपण पारंपरिक वेशभूषेत येणे म्हणजे आपल्या पूर्वजांची आठवण काढल्यासारखे आहे. 

प्रभारी प्राचार्य डॉ. ज्ञानदेव झांबरे म्हणाले, आपला भारत देश बहुभाषिक व बहुधर्मिय देश आहे. अशा सणांच्या निमित्ताने आपली संस्कृती सक्षम होताना दिसते. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंतचे आपले देशबांधव वेगवेगळा वेष परिधान करताना दिसतात, यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते. पारंपरिक वेशभूषा दिनासारख्या कार्यक्रमातून आपण संस्कृतीशी जोडले जातो.

कार्यक्रम अधिकारी डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक केले , कार्यक्रम अधिकारी डॉ. अंबादास सकट यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले तर, श्रीमती नीलम भोसले यांनी आभार मानले.

कार्यक्रमानंतर स्वयंसेविकांनी गट करून दांडिया व गरबा नृत्याचा आनंद लुटला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. संदीप वाटेगावकर, जितेंद्र चव्हाण, श्रीमती दीक्षा मोरे, आदिती  सोनावणे, अश्विनी गोळे, राणी सणस , धनश्री जाधव , श्रुती पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापक व एन.एस. एस.च्या  स्वयंसेविका यांनी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.