विशाल पाटील, ट्रेलर चांगला झाला पण ?

 विशाल पाटील, ट्रेलर चांगला झाला पण ?

------------------------------------

 मिरज तालुका  प्रतिनिधी

 राजू कदम

------------------------------------

   सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडूण आलेले खासदार विशाल पाटील यांनी लोकसभेत भाषेवरच्या प्रभुत्वाने चांगली छाप पाडली आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षात सांगलीच्या खासदाराचा आवाज संसदेत कधीच घुमला नव्हता. सांगली जिल्ह्यातील नेत्यांनी महाराष्ट्राचे राजकारण सांगलीतून केले. राज्यभर-देशभर आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली. राज्यात आपला दबदबा निर्माण केला पण संसदेत मात्र सांगलीचा आवाज क्षिण होता. सांगलीचे खासदार जिल्ह्यात शड्डू ठोकायचे, पोपटासारखे बोलायचे पण संसदेत मात्र त्यांच्या तोंडाला कुलपं लागलेली असायची. यापुर्वीचे सांगलीचे खासदार मुखदुर्बल घटकात मोडणारे होते. यात विशाल पाटलांचे वडील प्रकाशबापू पाटील, भाऊ प्रतिक पाटील आणि त्यांनी ज्यांचा पराभव केला ते भाजपाचे संजय पाटील यांची नावे आहेत. या खासदारांनी संसदेत कधीच आपली छाप पाडली नाही. त्यांना संसदेत कधीच धडपणे बोलता आले नाही. विशाल पाटलांनी पहिल्याच धडाक्यात हा अनुशेष भरून काढला. पुर्वीचे खासदार जिल्ह्यात बोलायचे पण संसदेत मात्र मौनीबाबा असायचे. विशाल पाटलांनी संसदेचे पहिलेच अधिवेशन गाजवले. इंग्रजी आणि हिंदी भाषेतून त्यांनी सांगली लोकसभा मतदार संघातील प्रश्न मांडताना आपली छाप पाडली. सांगलीचा आवाज बुलंद असल्याचे दाखवून दिले. त्यांच्या या धडाक्याने तमाम सांगली जिल्ह्याला त्यांचा अभिमान वाटला. संसदेत सांगलीचा आवाज बुलंद करणा-या विशाल पाटलांनी ट्रेलर तर जोरदार रंगवला आहे. आता येणा-या काळात बाकीचा चित्रपट कसा असेल ? याची उत्सुकता जिल्ह्यातील सर्व जनतेला आहे. अजून पाऊणे पाच वर्षे बाकी आहेत. उर्वरित चित्रपट कसा असेल ? याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे. 


       संजय पाटलांना लोकांनी सलग दोनवेळा चांगल्या मताधिक्याने निवडूण दिले. त्यांच्याकडून सर्वांना खुप अपेक्षा होत्या. पहिली पाच वर्षे तर त्यांनी जिल्हा पिंजून काढला. लोकांना त्यांचे काम आवडले होते. म्हणून त्यांना लोकानी दुस-यांदा सधी दिली. दुस-या वेळेसही ते चांगल्या मतांनी निवडूण आले. पण तिस-यावेळी मात्र सत्ता त्यांच्या डोक्यात गेली. त्यांच्या घमेंडीला वैतागेल्या लोकांनी त्यांचे पानीपत केले. नेते एका बाजूला आणि जनता एका बाजूला अशी ऐतिहासिक २०२४ ची निवडणूक झाली. पाच लाखाने येणार अशा वल्गना करणारे संजय पाटील पराभूत झाले. लोकांनी विशाल पाटलांचे पाकीट दिल्लीत पाठवले. विशाल पाटलांना इतके भरभरून मतदान करणा-या लोकांनी विशाल पाटलांच्यावर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास विशाल पाटलांनी तोडता कामा नये. संसदेत त्यांनी चांगली छाप पाडलीच आहे पण केवळ तेवढ्यावर भागणार नाही. त्यांना जिल्हाभर संपर्क ठेवावा लागेल. मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत त्यांना पोहोचावे लागेल. जिल्ह्याच्या विविध भागातले प्रश्न समजून घ्यावे लागतील आणि ते सोडवण्यासाठी धडपडावे लागेल. सरकारशी भांडून, झगडून जिल्ह्यासाठी निधी खेचून आणावा लागेल. त्यांचेच बंधू प्रतिक पाटील दोनवेळा खासदार झाले. केंद्रात त्यांना मंत्रीपदही मिळाले पण त्यांना सत्ता टिकवता आली नाही. आपली छाप पाडता आली नाही. ते लोकांच्यात राहण्यापेक्षा कुत्री खेळवण्यात जास्त व्यस्त असायचे. प्रतिक पाटील यांना लोकांची मनं जिंकता आली नाहीत. भरीव काम करता आले नाही. २०१४ च्या निवडणूकीत लोकांनी त्यांना राम राम केला. संजय पाटलांची तीच त-हा केली. सत्ता डोक्यात गेलेल्या संजय पाटलांना लोकांनी जमिनीवर आणले. ( ते अजून जमिनीवर आलेत की नाही हा संशोधनचा भाग आहे ) पण पाच लाखाच्या मताधिक्याची फुशारकी मारणा-या संजय पाटलांना लोकांनी पराभवाची धुळ चारत जमिनीवर आणले. 


      लोकांनी दिलेले हे वेगवेगळे कौल पाहून विशाल पाटलांनी जबाबदारीने वागायला हवे. लोक त्यांच्याकडे खुप अपेक्षेने पाहतायत. लोकांना त्यांच्याकडून भरीव कामाची अपेक्षा आहे. विशाल पाटलांनी त्यांचा प्रतिक पाटील किंवा संजय पाटील होवू देऊ नये. लोकांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवायला हवा. काही दिवसापुर्वी त्यांच्याकडे घोटी खुर्दचे काही लोक भेटायला गेले होते. जे कार्यकर्ते पुर्वी संजय पाटलांचे काम करत होते पण गत निवडणूकीत त्यांनी संजय पाटलांना डावलत विशाल पाटलांना पाठबळ दिले. त्यांचे काम केले. त्यांच्या गावातून त्यांना बहूमत दिले. तेच कार्यकर्ते गावातील तलावाच्या कामासाठी विशाल पाटलांना भेटायला गेले होते. विशाल पाटलांनी या लोकांना ताटकळत बसवले पण भेटही दिली नाही. असाच काहीसा अनुभव कवठेमहंकाळ तालुक्यातील काही लोकांना आल्याची चर्चा आहे. संजय पाटलांच्या डोक्यात सत्ता जायला दहा वर्षाचा काळ गेला. विशाल पाटलांच्या डोक्यात ती तीन-चार महिन्यात गेली की काय ? इतक्यात त्यांनी लोकांशी असे वागू नये. लोक अपेक्षेने त्यांच्याकडे जातायत. याचा अर्थ ते याचक आहेत, भिकारी आहेत असा होत नाही. खासदारांचे नाव विशाल आहे. त्यांनी मनालाही विशाल ठेवत येणा-या प्रत्येक माणसाची अडचण त्यांनी जाणून घ्यायला हवी. त्याची आस्थेने विचारपुस करायला हवी. शक्य असेल तर ती अडचण सोडवायला हवी. कारण याच सामान्य जनतेने सगळे नेते फाट्यावर मारत विशाल पाटलांना खासदार केले आहे. या जनतेचा विशाल पाटलांच्यावर हक्क आहे. विशाल पाटलांचा खराखुरा गॉडफादर हिच जनता होती. त्यांनी त्याच लोकांशी अशी वर्तणूक करू नये. लोक भल्या-भल्यांचा बाजार उठवतात याचे भानही त्यांनी ठेवावे. छप्पन इंचाची छाती आपटत तो-यात वावरणा-या मोदींना लोकांनी नुकत्याच झालेल्या निवडणूकीत त्यांच्या छातीचे नेमके 'माप' काय आहे ? ते दाखवून दिले आहे. मोदींची ही त-हा होवू शकते तर विशाल पाटलांचे काय ? त्यामुळे त्यांनी जपावं स्वत:ला. सत्तेची हवा डोक्यात जाऊ देवू नये. काही भोकं पडली असतील आणि त्यातून हवा आत जात असेल तर ती आत्ताच म्हणजे हातातून वेळ निघून जायच्या आधी बुजवून घ्यावीत. 


        विशाल पाटील दादांचे नातू आहेत दादांचा वारसा त्यांना लाभला आहे. पण आता वारसा कर्तृत्वाने सिध्द करावा लागतो. इथून पुढे कर्तृत्व गाजवावे लागेल केवळ वारसा सांगून चालणार नाही. भले भले वारसदार गारठले आहेत. ते फक्त संपत्तीचे मालक झाले पण जनतेचे होवू शकत नाहीत. विशाल पाटील हूशार आहेत. त्यांनी लोकांना जपावे आणि वारसा सिध्द करावा. त्यांचा ट्रेलर तरी अभिमानास्पद आहे. उर्वरित चित्रपट त्याहून सुंदर असावा अशीच अपेक्षा सर्वांची आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.