देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे धृतराष्ट्र.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे धृतराष्ट्र.
----------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजू कदम
----------------------------------
*रोहित पवार यांचा हल्लाबोल : 'तासगाव - कवठेमहांकाळ'साठी रोहित पाटील यांचा शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल.
महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डोळ्यावर गुजरातची पट्टी आहे. ते गुजरातच्या नेत्यांना खुश करत आहेत. त्यांचे गृहखात्यावर लक्ष नाही. राज्यात दडपशाही वाढली आहे. त्यामुळे फडणवीस हे महाराष्ट्राचे धृतराष्ट्र आहेत, असा हल्लाबोल कर्जत - जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला.
तासगाव - कवठेमहांकाळ मतदार संघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून रोहित पाटील यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांच्याकडे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तासगाव शहरातून रॅली काढून सभा घेण्यात आली. यावेळी रोहित पवार बोलत होते. यावेळी खासदार विशाल पाटील, अनिता सगरे, सुरेश पाटील, स्मिता पाटील, हणमंत देसाई, शंकर पाटील, ताजुद्दीन तांबोळी, दादासाहेब कोळेकर, सचिन खरात, हायुम सावणुरकर उपस्थित होते.
यावेळी रोहित पवार म्हणाले, तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात दडपशाही सुरू आहे. विरोधकांचे मतदारांना फोन येत आहेत. बघतो, करतो अशा धमक्या येत आहेत. मात्र लोकांनी या धमक्यांना घाबरून जाऊ नये. मतदारांनी विरोधकांचा लोकसभेला करेक्ट कार्यक्रम केला आहे. तसाच कार्यक्रम आता विधानसभेलाही करा. मतदार संघात मलिदा गोळा करणारी, दडपशाही करणारी गॅंग तयार झाली आहे. मतदारसंघातील जमिनीचा ताबा घेणारी ही गॅंग नेस्तनाबूत करावी लागेल.
ते म्हणाले, विरोधकांनी रोहित पाटील यांना बच्चा समजले आहे. मात्र त्यांना बच्चा समजणारे स्वतः कच्चे आहेत. स्व. आर. आर. पाटील यांचा छावा या निवडणुकीत उभा आहे. त्यामुळे महाराष्ट्राला पुन्हा एकदा आर. आर. पाटील देण्याचे काम मतदारांनी करावे. मतदारसंघातील दडपशाहीला हद्दपार करावे.
ते म्हणाले, तासगाव कवठेमहांकाळच्या निवडणुकीची महाराष्ट्रात चर्चा आहे. आज रोहित पाटील यांचा अर्ज भरायला आलेल्या लोकांची गर्दी पाहून ते एक लाख मतांनी निवडून येतील, असा विश्वास वाटतो. या मतदारसंघाचे पालकत्व शरद पवार यांनी घेतले आहे. त्यांचे आर. आर. पाटील यांच्यावर अतोनात प्रेम होते. आबांचेही पवारांवर प्रेम होते.
आबांनी गृहमंत्री असताना अनेक धाडसी निर्णय घेतले. डान्सबार, बंदी करीत सावकारीलाही आळा घातला. त्यावेळी त्यांना अंडरवर्ल्डसह अनेकांचे फोन आले. धमक्या दिल्या गेल्या. मात्र आर. आर. पाटील आपल्या निर्णयापासून मागे हटले नाहीत. आता मात्र महाराष्ट्राची बिकट अवस्था आहे राज्यात गुंडगिरी वाढली आहे. दडपशाही केली जात आहे. तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघातही दडपशाही केली जात आहे. विरोधकांचे सामान्य लोकांना फोन जात आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. मात्र लोकांनी धमक्यांना घाबरून जाऊ नये. जर तासगाव - कवठेमहांकाळमधील कोणावर अन्याय केला तर त्याला सोडणार नाही.
ते म्हणाले, रोहित पाटील यांना निवडून देताना कर्जत जामखेडशी तुलना करा. मला त्या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने मतदार निवडून देतात. त्यापेक्षाही ज्यादा मतांनी निवडून देण्याचे रेकॉर्ड तासगाव - कवठेमहांकाळकरांनी करावे. या निवडणुकीमध्ये विरोधकांकडून पैशाचा वापर होणार आहे. मोठमोठी आश्वासने दिली जातील. मात्र अद्याप विरोधकांपैकी छोटा उभा राहतोय की मोठा राहतोय, हे नक्की नाही. पण तुम्ही रोहित पाटील यांच्यासाठी पुढचे महिनाभर जीवाचं रान करा.
आमदार सुमन पाटील म्हणाल्या, आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर मतदारसंघाने मला दोन वेळा संधी दिली. गेल्या नऊ वर्षात मी माझं दुःख बाजूला ठेवून जनतेची सेवा केली. आता यापुढील काळात आबांचा मुलगा आपल्या सेवेसाठी देत आहे. त्यालाही पाठबळ द्यावे. त्याला संधी दिल्यास आर. आर. पाटील यांच्यापेक्षाही तो चांगले काम करेल.
रोहित पाटील म्हणाले, या निवडणुकीच्या निमित्ताने माझ्या आयुष्याची नवीन सुरुवात होत आहे. आर. आर. पाटील आपल्यातून गेले आहेत, असे कधी वाटलेच नाही, इतके प्रेम मला मतदारसंघाने दिले आहे. मतदारांनी गेली अनेक वर्षे आर. आर. पाटील यांच्यासह सुमन पाटील यांच्यावर विश्वास दाखवला. त्याबद्दल सर्वांचा मी ऋणी आहे.
विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, आमदार सुमन पाटील या महिला आहेत, त्या काय काम करू शकणार, अशी खिल्ली विरोधक उठवत होते. मात्र पुरुष म्हणणाऱ्या विरोधकांनी तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आम्ही बसलेल्या घरावर दगडफेक करून नेमके कोणते पुरुषत्व सिद्ध केले आहे, हे समजायला मार्ग नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघाच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. मात्र आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे काम विरोधक करीत आहेत. विविध पाणी योजना मार्गी लावल्या. एमआयडीसी मंजूर करून आणली. मात्र विरोधकांनी पुणे, मुंबई, दिल्ली येथील पीआर टीम आणून स्वतःचे ब्रॅण्डिंग करण्यास सुरुवात केली आहे.
या निवडणुकीत मतदारांनी मला संधी दिल्यास पाणी योजनांच्या सिंचनाचे वेळापत्रक तयार करू. शेतकऱ्यांना त्यामुळे त्रास होणार नाही. एमआयडीसी उभी करून सुमारे दहा हजार तरुणांना रोजगार निर्मिती करणार आहे. द्राक्ष उत्पादकांच्या ज्या अडचणी आहेत त्याबाबत विधानसभेत आवाज उठवणार आहे. विरोधक आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. तासगावच्या रिंग रोडच्या बाबतीतही तेच झाले आहे. या रिंग रोडसाठी मी तब्बल 17 वेळेला दिल्लीला नितीन गडकरी यांच्याकडे गेलो आहे.
मात्र विरोधकांनी गडकरींनाच खोटे ठरवले. त्यांचे वय झाले आहे, असे म्हणून त्यांचा अपमान केला. दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर एक इंचही जमीन अनधिकृतपणे कोणाच्या नावावर होऊ देणार नाही. सामान्य लोकांना त्रास देणाऱ्याला सोडणार नाही, असा इशारा पाटील यांनी शेवटी दिला.
*तासगाव - कवठेमहांकाळमधील गुंडगिरी हद्दपार करू : रोहित पाटील*
स्व. आर. आर. पाटील यांनी राज्यातील गुंडगिरी हद्दपार केली होती. मात्र आता तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघात विरोधकांनी गुंडगिरी सुरू केली आहे. या विधानसभा निवडणुकीनंतर तासगाव - कवठेमहाकाळ मतदारसंघातील विरोधकांची ही गुंडगिरी हद्दपार केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा इशारा रोहित पाटील यांनी यावेळी दिला.
Comments
Post a Comment