हरोली (जि.कोल्हापूर) येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित.

हरोली (जि.कोल्हापूर) येथे पश्चिम महाराष्ट्रातील पहिला सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मधून ७९० शेतकऱ्यांना होतोय दिवसा वीजपुरवठा.

*कोल्हापूर/सांगली  दि. 8 ऑक्टोबर २०२४:-*

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० राबविण्यात येत आहे. त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून पश्चिम महाराष्ट्रातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प हरोली (जि.कोल्हापूर) येथे अवघ्या सहा महिन्यात कार्यान्वित झाला आहे. या प्रकल्पामुळे हरोली व जांभळी या गावांतील ७९० शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा सुरु झाला आहे.  


कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पीएम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजना राबविण्यात येत आहे. राज्यात उभारण्यात येणाऱ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सोलर पार्कचे लोकार्पण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवारी (दि.०५) रोजी वाशिम जिल्ह्यातून दूरदृष्यप्रणालीद्वारे करण्यात आले. यामध्ये हरोली (जि. कोल्हापूर) येथील प्रकल्पाचाही समावेश आहे. 


*कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात ८८ प्रकल्प प्रस्तावित*

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात ५४ ठिकाणी (एकूण क्षमता १७० मेगावॅट) व सांगली जिल्ह्यात ३४ ठिकाणी (एकूण क्षमता २०७ मेगावॅट)  सौर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता ३७७ मेगावॅट आहे. या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ७५ कृषी वाहीन्यांवरील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे. कमी दाबाच्या (लो व्होल्टेज) तक्रारी देखील दूर होणार आहेत. या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसही चालना मिळणार आहे. 


*ग्रामपंचायातींना वार्षिक पाच लाख अनुदान* 

या प्रकल्पास जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना पाच लाख अनुदान देण्यात येत आहे. अशा पद्धतीने सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीस मदत करणाऱ्या राज्यातील ४११ ग्रामपंचायतींना मा. पंतप्रधानांच्या हस्ते २०.५५ कोटी रुपये विकासनिधी नुकताच ऑनलाईन पद्धतीने देण्यात आला आहे.


*दिवसा वीज मिळणे स्वप्नवत – तानाजी यशवंत माने, सरपंच, हरोली* 

आमच्या गावच्या जमिनीवर उभारलेल्या तीन मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्पामुळे भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. रात्री शेतीला पाणी देण्यासाठी अनेक अडचणी येत होत्या, आता अशा अडचणीपासून शेतकऱ्यांची मुक्तता झालेली आहे. शेतकरी दिवसभर शेतीत काबाडकष्ट करून संध्याकाळचा वेळ आपल्या कुटुंबाबरोबर निवांतपणे घालवू शकतो.  या प्रकल्पाकरता मी संपूर्ण गावाच्या वतीने शासनाचे आभार मानत आहे.


*सौर प्रकल्प ग्राहक हिताचे – स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता, महावितरण*

वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणार आहे. या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत. दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीनी या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा.

 

*सोबत :- 1. हरोली (जिल्हा कोल्हापूर) येथील सोलार प्रकल्पाचे फोटो व व्हीडीओ*

  *2. स्वप्नील काटकर, मुख्य अभियंता, महावितरण यांचा व्हीडीओ*

  *3. तानाजी यशवंत माने, सरपंच, हरोली यांचा व्हीडीओ*

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.