किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.
-----------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
----------------------------------
येथील किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयात जिल्हास्तरीय देशभक्त आबासाहेब वीर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेचे हे ४४ वे वर्ष होते. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, उपप्राचार्य श्री. बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव,स्पर्धा समिती समन्वयक सौ. गौरी पोरे इ. मान्यवरांच्या हस्ते देशभक्त आबासाहेब वीर आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी व स्वर्गीय प्रतापराव (भाऊ) भोसले यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. स्पर्धकांना वक्तृत्व स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना मा. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, "वक्तृत्व हे प्रभावी व्यक्तिमत्त्वाचे महत्त्वपूर्ण अंग आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासातून विकसित केलेले स्वतःचे विचार समाजासमोर ठामपणे मांडण्यासाठी वक्तृत्व कलेचा आधार घ्यावा लागतो. या कलेच्या साधनेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. प्रभावी विचारांच्या मांडणीचे कौशल्य असलेले नेतृत्व समाजाला प्रगतीच्या दिशेने पुढे घेऊन जात असते. स्पष्ट उच्चार, आवाजातील आरोह-अवरोह, स्वाभाविक होणाऱ्या हालचाली आणि अभ्यासाचा व्यासंग या बाबींकडे जाणीवपूर्वक लक्ष दिल्यास आत्मविश्वासाने कोणतीही सभा गाजवता येते. म्हणून विद्यार्थी दशेमध्येच वक्तृत्वाचे संस्कार घडायला पाहिजेत".
स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले. लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा मधील वैभवी श्रीरंग पाटेकर हिने प्रथम क्रमांक,काकासाहेब परांजपे महाविद्यालय रहिमतपूर मधील समीक्षा दिलीप पवार हिने द्वितीय क्रमांक,किसन वीर महाविद्यालय वाई मधील सायुरी उमेश सणस हिने तृतीय क्रमांक, यशवंतराव चव्हाण इन्स्टिटयूट ऑफ सायन्स सातारा मधील आर्यन सागर धोंडवड याने चतुर्थ क्रमांक तर राजा भगवंतराव ज्यूनिअर कॉलेज औंध मधील रसिका गोरख मुळीक हिने पाचवा क्रमांक प्राप्त केला.
प्रथम क्रमांक मिळविलेल्या स्पर्धकाला देशभक्त आबासाहेब वीर करंडक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. दुसऱ्या, तिसऱ्या,चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना देशभक्त आबासाहेब वीर स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम अशी पारितोषिके देण्यात आली. प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या शुभहस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
बापूसो. शिंदे माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री.अनिल सपकाळ आणि किसन वीर महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्राध्यापक डॉ. अमोल कवडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. वक्तृत्व स्पर्धा समितीच्या समन्वयक सौ. गौरी पोरे यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. श्रीमती निलिमा महाडिक यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्री शिवाजी जाधव यांनी स्पर्धेच्या नियमांच्या यादीचे वाचन केले. श्री सुमित वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. श्री पराग डोंगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी श्री. सतीश तावरे , श्री. हरेश कारंडे, श्री. श्रावण पवार आणि समितीतील सर्व सदस्यांनी विशेष प्रयत्न केले.
Comments
Post a Comment