"कृष्णाई" वार्षिक नियतकालीकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

 "कृष्णाई" वार्षिक नियतकालीकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न.

---------------------------------------

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

वाई : दि. ०६/०९/२०२४ येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयाच्या कृष्णाई २०२४ या अंकाचे प्रकाशन कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध साहित्यिक अॅड. सीमंतिनी नूलकर यांच्या हस्ते महाविद्यालयात उत्साहात संपन्न झाला. यावेळी जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा मदनदादा भोसले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. 

प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने बोलताना ॲड. नूलकर म्हणाल्या की," वाई हे शहर सांस्कृतिक अंगाने खूप नटलेलं आहे. त्यामुळे मला वाई शहराबद्दल लहानपणापासूनच एक वेगळं आकर्षण आहे. कृष्णाई २०२४ हा अंक अत्यंत साहित्यिक गुणांनी युक्त असा असून, कसदार झाला आहे. कारण विद्यार्थ्यांनी मेहनत घेवून, अभ्यास करून, संशोधन करून या अंकामध्ये लेख लिहिलेले आहेत. हे सर्व लेख  वाचकाला भुरळ पाडणारे आहेत. त्यामुळे "कृष्णाई"ने आपला साहित्यिक दर्जा राखला आहे. कृष्णाईमधून  सामाजिक भान राखून साहित्याची निर्मिती झाली असल्याने हा अंक चौफेर लिखाणांनी युक्त असा झाला आहे. या प्रकाशन सोहळ्या निमित्ताने कार्यक्रमास संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री बाळासाहेब कोकरे, पर्यवेक्षक श्री. अर्जुन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

अॅड. नूलकर पुढे म्हणाल्या की, "कृष्णाई मधील एका लेखात विद्यार्थ्याने स्व.प्रतापराव भोसले यांचे एक वाक्य घेतलेले आहे की "तुमचं सामाजिक ज्ञान हे शैक्षणिक ज्ञानापेक्षा जास्त असायला पाहिजे"  हे वाक्य मनाला खूप भावले. आपण वर्तमानात जगायला शिकले पाहिजे. निसर्गाच्या जितके आपण जवळ जाऊ तितकेच आपण  आनंदी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून आयुष्य जगू. जीवनामध्ये जगत असताना आपणच सिटीझन सायंटिस्ट म्हणून काम केले पाहिजे".

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना मा. मदनदादा भोसले म्हणाले की, "जीवन जगत असताना आपण ते मुक्तपणाने आणि आनंदाने जगायला शिकलं पाहिजे. अॅड. नूलकर यांचे प्रवास वर्णनात्मक साहित्य अत्यंत लालित्यपूर्ण शब्दांमध्ये असून; ते रसिक म्हणून वाचत असताना एक वेगळाच आनंद प्राप्त होतो. साहित्यातील अशा जाणकार मंडळींच्या हस्ते कृष्णाई या अंकाचे प्रकाशन होत असताना मला खरोखर मनापासून आनंद होत आहे."

कार्यक्रमाची सुरुवात किसन वीर (आबा) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून करण्यात आली.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये कृष्णाई हा अंक विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व त्यामधून नवीन लेखक निर्माण करण्यासाठी एक सक्षम असे व्यासपीठ आहे त्यासाठीच कृष्णाईची निर्मिती झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा उपयोग सक्षमपणे करावा" असे आवाहन केले. कृष्णाई या नियतकालिकेच्या अंतरंगाविषयी कार्यकारी संपादक डॉ. मंजुषा इंगवले यांनी सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी प्रमुख संपादक तसेच उपसंपादक यांचा सत्कार प्रमुख पाहुणे अॅड. सिमंतिनी नूलकर यांच्या हस्ते करण्यात आला.

त्याबरोबर मुखपृष्ठाचे रेखाटन करणाऱ्या विद्यार्थिंनी कु. शिवांजली वरखडे आणि कु. यशस्विनी चोरगे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

डॉ. शिवाजी कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. श्रीमती दिपाली चव्हाण यांनी आभार मानले. तर  डॉ.अरुण सोनकांबळे यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमाप्रसंगी किसन वीर महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ शाखेतील सर्व प्राध्यापक, शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.