तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा -निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली.
तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा -निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली.
कोल्हापूर, दि. 27 (प्रतिनिधी): तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना सामोरे जावे लागते. यासाठी जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केल्या.
जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण समिती व सनियंत्रण समितीची बैठक श्री. तेली यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त तुषार शिंगाडे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे जिल्हा सल्लागार डॉ. निलेश पाटील, समुपदेशक चारुशीला कणसे, सामाजिक कार्यकर्त्या क्रांती शिंदे, कार्यक्रम सहायक प्रियांका लिंगडे आदी उपस्थित होते.
श्री तेली म्हणाले, नागरिकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्याबाबत व्यापक जनजागृती करा. तसेच जिल्हा स्तरावर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा, अशा सूचना त्यांनी दिल्या. शाळा व महाविद्यालयांच्या आवारात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व सेवन होणार नाही, याची दक्षता शाळा व महाविद्यालय प्रशासनाने घ्यावी.
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन टाळण्याबाबत तंबाखू मुक्तीची शपथ, माहितीपत्रकांचे वाटप व अन्य माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करणाऱ्या व्यक्तींच्या मुखाची तपासणी करण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन विद्यार्थ्यांपर्यंत आवश्यक ती माहिती पोहोचवण्यात येत असल्याची माहिती डॉ. निलेश पाटील यांनी दिली.
Comments
Post a Comment