विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करून कर्मयोगी बनावे डॉ. संदीप वाटेगांवकर.

 विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करून कर्मयोगी बनावे डॉ. संदीप वाटेगांवकर.

--------------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

‘किसन वीर’ च्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा कार्यक्रम

वाई : दि. ०२ सप्टेंबर

  स्वामी विवेकानंद यांचे विचार प्रेरणादायी आहेत. अखिल मानवजातीच्या उद्धाराचे बीज त्यांच्या विचारात आहे. २१ व्या शतकात जन्मलेल्या युवा पिढीने विवेकानंदांचे विचार समजून घ्यावेत, ते जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करावा. युवकांनी  स्वामी विवेकानंद यांचे विचार आत्मसात करून कर्मयोगी बनावे. असे प्रतिपादन डॉ. संदीप वाटेगांवकर यांनी केले.

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते ‘स्वामी विवेकानंद यांचे विचार’ या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्र. प्राचार्य प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. कार्यक्रमास कला विभागाचे उपप्राचार्य प्रा. (डॉ.) चंद्रकांत कांबळे, डॉ. राजेश गावित, प्रकल्प अधिकारी डॉ. संग्राम थोरात, डॉ. अंबादास सकट, डॉ. प्रेमा यादव, श्रीमती दीक्षा मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

  डॉ. संदीप वाटेगांवकर म्हणाले, स्वामी विवेकानंद यांनी मनावर ताबा मिळवला होता. जो मनाने सुदृढ असतो, त्याला जगातील कोणतेही काम अशक्य नाही. विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचा भक्तियोग, राजयोग, ज्ञानयोग समजून घ्यावा व यांना कर्मयोगाची जोड देऊन आपले व्यक्तिमत्व संपन्न करावे. जीवनात एकाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावा व ध्यासाला संकल्पाची जोड देऊन जीवन विकास साधावा. १८९३ साली शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी दिलेला विश्वबंधुत्वाचा संदेश आजच्या युवकांनी अंगिकारण्याचे आवाहन त्यांनी केले.

आपल्या अध्यक्षीय मनोगतात प्र. प्राचार्य प्रा. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे म्हणाले, नरेन्द्र ते स्वामी विवेकानंद हा विवेकानंदांचा जीवन प्रवास थक्क करणारा आहे. एक साधूवृत्तीची भारतीय व्यक्ती भारतीय संस्कृतीच्या बळावर जग जिंकू शकते, याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वामी विवेकानंद हे होय. आपणही इच्छाशक्ती व निश्चयाच्या जोरावर आपला उद्धार घडवू शकतो.

व्याख्यानानंतर १८९३ साली शिकागोच्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेल्या भाषणावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेत ६१ स्वयंसेवकानी भाग घेतला.

प्रकल्प अधिकारी  डॉ. संग्राम थोरात यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. श्रीमती सुमती कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राची जगताप, नेहा पिसाळ, प्रिशा साळुंखे, सिद्धी गायकवाड, ऋतुजा जगताप, दुर्वा  हेरकळ, गौरी गहीण, सायली ठोंबरे, सायली कांबळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमात एन.एस. एस.च्या  स्वयंसेवकानी सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.