किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न.

 किसन वीर महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न.

---------------------------------------

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

वाई, दि. २८ : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालायात इंग्रजी आणि बी.सी.ए. विभाग, वाड्मय मंडळ, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि अखिल भारतीय इंग्रजी शिक्षक संघटना सातारा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिएटीव्ह रायटिंग या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस  बिजभाषक म्हणून कवी डॉ. दीपक बोरगावे आणि साधन व्यक्ती म्हणून कवी डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमप्रसंगी संस्थचे अध्यक्ष आदरणीय  मदनदादा भोसले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य श्री. भीमराव पटकुरे, ‘अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष’ चे समन्वयक  डॉ. शिवाजी कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यशाळेत बिजभाषक म्हणून बोलताना दीपक बोरगावे म्हणाले की, ‘साहित्य निर्माण करणारा माणूस कवी हृदयाचा असावा लागतो’. साहित्याद्वारे योगदान देत असताना अनुभव, व्यासंग, संवेदनशीलता इ. गुण विकसित करावे लागतात, त्यावेळी त्यांनी मराठी कवी ग्रेस यांची 

‘पाऊस कधीचा पडतो | झाडांची हलती पाने |

हलकेच जाग मज आली | दुःखाच्या मंद सुराने ||

ही कविता समजावून सांगितली, या कवितेतील दुःख ग्रेस यांनी आईला गमावाण्यातून उद्भवल्याचे सांगितले.

कार्यशाळेचे साधन व्यक्ती डॉ. रघुनाथ कडाकणे म्हणाले की, माणसाचे पोट, हृदय व मेंदू हे तीन महत्वाचे अवयव असून आपल्याला न आलेल्या अनुभवाविषयीसुद्धा माणूस आपल्या प्रतिभेच्या सहाय्याने लिहू शकतो. त्यांनी त्यांच्या ‘माझे मिथ्याचे प्रयोग’ या कादंबरीत नायकाला आलेल्या अपघाती मृत्यूचे वर्णन कोणत्याही अनुभवा शिवाय केले होते. 

कार्यशाळेचे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष माननीय मदनदादा भोसले म्हणाले, ‘ साहित्य निर्मितीविषयी मार्गदर्शन मिळण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्वाची असून वेगवेगळ्या माध्यमाद्वारे व्यक्त होण्यास विद्यार्थ्यांना ती प्रवृत्त करेल असे मला वाटते.  

अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, सर्जनशिलतेतून साहित्य निर्माण होत असते. त्यासाठी प्रसंग, अनुभव, कल्पना, विचार आणि अनुभूतीचा आधार घेतला जातो आणि सहजगत्या अनाकलनीय असणारे विचार प्रत्यक्षात साहित्याच्या माध्यमातून पुढे येतात. कार्यशाळेचे वर्णन त्यांनी पुढील पंक्तीच्याद्वारे मांडले.

हृदयात मी स्वतःच्या, पेरून गीत त्यांचे |

गाढलेले बीज माझे, मातीत अंकुरताहे ||

हुंगतो फुले तयाची, हृदयात फुलल्या वयाची |

फुललेली बाग माझी, तुम्ही फुले तयाची ||  

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये इंग्रजी विभागप्रमुख प्रोफेसर डॉ. सुनील सावंत यांनी कार्यशाळेचे महत्व सांगून पाहुण्यांची ओळख करून दिली, डॉ. अंबादास सकट यांनी आभार मानले तर श्रीमती रेश्मा मुलाणी  यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बाळकृष्ण मागाडे, विभागातील सर्व प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील विविध विभागातील प्राध्यापक, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.