किसन वीर महाविद्यालयात अग्नी सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

 किसन वीर महाविद्यालयात अग्नी सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

--------------------------------------- 

वाई प्रतिनिधी 

कमलेश ढेकाणे 

--------------------------------------- 

वाई, दि. ०४/०९/२०२४ 

येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभाग हा संशोधन केंद्र म्हणून परिचित आहे. या विभागाची व एकूणच महाविद्यालयाची सुरक्षितता महत्वपूर्ण असल्याने या विभागाच्या वतीने अग्नी सुरक्षा प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. यासाठी प्रशिक्षक म्हणून पुणे महानगपालिकेचे अग्निशामक दलातील  श्री. आदित्य कदम यांनी धोक्याच्या प्रसंगी अग्निशामक यंत्राचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह दिले. या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांनी भूषविले. याप्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. शिवाजी कांबळे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रो. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

अग्निशामक यंत्राची माहिती देताना श्री. कदम म्हणाले, एखादी विस्फोटक दुर्घटना घडल्यास त्यावर उपाययोजना कशी करावी व विद्यार्थ्यांनी सतर्क कसे राहावे याची माहिती दिली. या यंत्रामध्ये कार्बन डाय ऑक्साईड वायू व रासायनिक पावडर असल्याने त्याचा अग्निवरती मारा झाल्याने आग तात्काळ विझून, अनुचित घटना टळते. तसेच अग्निशामक यंत्र व घरगुती गॅस सिलेंडर यांच्यावर असणाऱ्या सांकेतिक चिन्हांचे अर्थ उलगडून सांगितले. अग्निशामक विभाग हा केवळ आग विझवणे या पुरता मर्यादित न राहता माणूस, प्राणी व पक्षी यांचे जीव वाचविण्याचे कामही मोठया धडाडीने करीत असतो. 

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. फगरे म्हणाले, रसायनशास्त्र विभागाच्या प्रयोगशाळेत अनेक स्फोटक रसायने असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी अग्नीपासून सतर्क राहणे गरजेचे आहे. रसायनशास्त्र विभागाने घेतलेली ही कार्यशाळा केवळ विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त नसून सर्वांनी तिचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवाहन केले. या प्रशिक्षणामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेचा उपयोग प्रयोगशाळेबरोबरच घरगुती वापरातील ज्वलनशील उपकरणांसाठीही करावा. 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. झांबरे यांनी या कार्यशाळेचा हेतू स्पष्ट करून महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेमध्ये असणाऱ्या अनेक स्फोटक रसायनांची सविस्तर माहिती दिली. डॉ. संदीप वाटेगावकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर आभार श्रीमती दीपाली पाटील यांनी मानले. 

या कार्यक्रमामध्ये रसायनशास्त्र विभागाचे इंस्टाग्राम व युट्यूब चॅनेल प्राचार्य डॉ. फगरे यांच्या शुभ हस्ते कार्यान्वित करण्यात आले. सदर चॅनेल हाताळणारे रसायनशास्त्र विभागातील श्री. अजित पांढरे, विद्यार्थिनी कु. स्वामिनी पवार, कु. सानिका चिकणे यांचे अभिनंदन करण्यात आले. 

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी रसायनशास्त्र विभागातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यशाळेस डॉ.आनंद घोरपडे, प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.