शासनातील प्रत्येक विभागाशी समन्वय ठेवून काम करणारी यंत्रणा म्हणजे महसूल विभाग - के.मंजूलक्ष्मी.
शासनातील प्रत्येक विभागाशी समन्वय ठेवून काम करणारी यंत्रणा म्हणजे महसूल विभाग - के.मंजूलक्ष्मी.
-----------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
-----------------------------------
*महसूल पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन महापालिका आयुक्त के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते संपन्न.
*सर्वसामान्य जनतेमधील असलेली प्रतिमा अधिक दृढ करूया - जिल्हाधिकारी अमोल येडगे.
दि. 1 ऑगस्ट* : जनसामान्यांमध्ये कामाच्या प्रत्येक टप्प्यावर शासनातील तलाठी, तहसीलदार आणि कलेक्टर ही पदे अगदी खोलवर रुजलेली असून महसूल विभाग शासनाच्या प्रत्येक विभागाशी समन्वय ठेवून काम करणारी यंत्रणा आहे असे प्रतिपादन महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात जिल्हा प्रशासनाच्या वतीने महसूल दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महसूल दिन व महसूल पंधरवडा कार्यक्रमाचा शुभारंभ तसेच उद्घाटन महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी त्या बोलत होत्या. त्यांनी सर्व महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांना महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. शारीरिक आरोग्यासह प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्या मानसिक आरोग्याचीही तितकीच काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. यासाठी एखाद्या समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात यावे. लोकाभिमुख झालेले प्रशासन यातून वारंवार जनसामान्यांचा संवाद प्रशासनाबरोबर होत असतो. दैनंदिन कामांमध्ये वेगवेगळ्या घटकातून आलेल्या लोकांना सामोरे जात असताना प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याने आपले मानसिक स्वास्थ्यही जपले पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले. महसूल दिन कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सर्व अतिथींचे स्वागत केले. यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस., अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, उपजिल्हाधिकारी महसूल डॉ.संपत खिलारी आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीपप्रज्वलन करून मान्यवरांचे स्वागत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. महसूल विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध योजनांमधील निवडक लाभार्थ्यांना यावेळी योजनांचा लाभ देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यामध्ये संजय गांधी योजनेतील कोल्हापूर शहरातील लाभार्थी तसेच प्राधान्य गटातील शिधापत्रिका वाटप, जिल्हा पुनर्वसन कार्यालयांमधील प्रकल्पग्रस्त दाखला आधारे शासकीय लाभ यामध्ये शिक्षक म्हणून नियुक्ती तसेच तलाठी म्हणून नियुक्ती बाबत सत्कार करण्यात आला. नवनियुक्त तलाठी आदेश तसेच वीरमाता यांना शासकीय जमीन वाटपाचा आदेश देण्यात आला. वडणगे येथील खंडकरी शेतकरी वर्ग दोन चे वर्ग एक मध्ये रूपांतर केल्याचा आदेशही यावेळी मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी केले तर आभार जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी नलिनी मोहिते यांनी केले.
शिवाजी भोसले, यांनी महसूल विभाग म्हणजे सर्व प्रकारचा राजस्व गोळा करून तो शासनाकडे जमा करणारा महत्त्वाचा विभाग असल्याचे मत व्यक्त केले. महसूल मधील काम संपूर्ण देशाला दिशादर्शक असून आधुनिक तंत्रज्ञानानाच्या वापराने अधिक गतीमानता प्राप्त केलेला विभागही असल्याचे ते यावेळी म्हणाले. अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी काळानुरूप महसूल मध्ये अनेक बदल झाल्याचे सांगितले. कोल्हापूर जिल्हा सर्वच योजनांच्या अंमलबजावणीमध्ये अग्रेसर असतो. संगणीकरणामुळे घरपोच सेवा देण्यास सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले. नवीन अद्यावत माहितीच्या युगात महसूल खात्याने नवीन तंत्रज्ञानाचा अंगीकार करून सर्वसामान्यांना जलद लाभ देण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
*मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्तिकेयन एस.* - महसूल विभाग म्हणजे प्रत्येक शासकीय विभागांची जननी असल्याचे सांगत, महसूल दिनाच्या शुभेच्छाा दिल्या. पंधरा दिवसातील विविध कार्यक्रमांचा फायदा नागरिकांनी करून घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
*पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडीत* – महसूल दिनानिमित्त शुभेच्छा देवून त्यांनी स्वतंत्रपूर्व काळापासून महसूल विभागाने आपले महत्त्व अबाधित ठेवले असल्याचे सांगितले. पोलीस आणि महसूल एकाच नाण्याच्या दोन बाजू असून विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या विभागांमध्ये महसूल अग्रस्थानावर आहे. आताच्या काळात लोकांच्या अपेक्षा वाढल्याने या विभागाचे महत्त्वही अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महत्त्वाच्या योजनाही याच विभागला विश्वासाने अंमलबजावणीसाठी दिल्या जातात.
*सर्वसामान्य जनतेमधील असलेली प्रतिमा अधिक दृढ करूया - जिल्हाधिकारी अमोल येडगे*
राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करताना अनेक कार्यक्रम घेतले जात असून महसूल पंधरवडा आयोजित करीत असताना लोकाभिमुख योजना अधिक गतीने राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले. ते म्हणाले, माझी लाडकी बहीण योजनेत जिल्हयातून ६.८० लाख अर्ज नोंदणी झाली आहे. यात महत्त्वाचे काम प्रशासनाने केले. राज्याकडे समितीकडून अंतिम मंजूरी मिळालेले ८० हजार अर्ज नुकतेच सर्वात आधी पाठविले आहेत. पुढिल १५ दिवस महसूल पंधरवडा मधून वेगवेगळे कार्यक्रम चालणार असून जास्तीत जास्त लाभ वितरित करा. वेगवेगळी प्रशिक्षण आयोजित करा. आपत्ती व्यपस्थापनाचे धडे सर्वांना द्या. महसूल विभागाशी निगडीत आलेल्या समस्यांचे निराकरण करून आपली असलेली प्रतिमा अधिक चांगली करा. महसूल जमा करण्यासोबतच जमिनीचा न्याय निवडा करणारी महत्त्वाची यंत्रणा महसूल विभाग आहे. इतर विभागांना मदत करण्यासह सर्वसामान्य जनतेमधील असलेली प्रतिमा अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
*ऑलिम्पिक ब्रांझ पदक विजेता स्वप्निल कुसाळे याचे अभिनंदन*
महसूल दिनाच्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नुकतेच पॅरीस येथील ऑलिम्पिक मध्ये कांबळवाडी राधानगरी जि. कोल्हापूर येथील ब्रांझ पदक मिळालेला विजेता स्वप्निल कुसाळे याचे विशेष अभिनंदन केले. तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपला जिल्हा, राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबिय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीने अभिनंदन यावेळी करण्यात आले.
Comments
Post a Comment