स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) "उपेक्षित समाजाबद्दल प्रचंड कणव असलेला नेता"
स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) "उपेक्षित समाजाबद्दल प्रचंड कणव असलेला नेता"
---------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------------
- डॉ. जयवंत चौधरी
वाई : दि.१९/६/२०२४
"स्व.प्र तापराव भोसले (भाऊ) यांचा लोकसंग्रह प्रचंड मोठा होता. समाजातील गोरगरीब, उपेक्षित वर्ग शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून किसन वीर महाविद्यालयाच्या माध्यमातून शिक्षणाची सोय करून अनेक गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना भाऊंनी मदतीचा हात दिला. समाजातील गरीब, वंचित, उपेक्षित लोकांविषयी स्व. प्रतापराव भोसले (भाऊ) यांना प्रचंड कणव होती. मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या माझ्या भूमिकेला भाऊंनी सतत पाठिंबा दिला." असे प्रतिपादन माजी प्राचार्य व जनता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी यांनी केले. येथील किसन महाविद्यालयाच्या वतीने जनता शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त स्व.प्रतापराव भोसले उर्फ भाऊ यांच्या द्वितीय मासिक पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
डॉ. चौधरी म्हणाले की, "किसन वीर महाविद्यालयाच्या प्रगतीमध्ये मा. भाऊंचा सिंहाचा वाटा आहे. कोणतेही काम करताना त्याची सखोल माहिती घेऊन ते काम तडीस नेत. एखादी समस्या निर्माण झाली तर तीच्या मुळाशी जाऊन ती समस्या कायमस्वरूपी सोडविण्यावर त्यांचा कटाक्ष होता. भाऊंकडे जिद्द आणि चिकाटी होती. त्या जोरावरच भाऊंनी महाविद्यालयामध्ये विज्ञान शाखा सुरू करून; त्यासाठी आवश्यक असणारी सुसज्ज अशी इमारत उभी केली. भाऊं स्वभावाने कडक असले तरी ते इतरांचा येथोचित सन्मान करीत. येणाऱ्या पाहुण्यांचे आग्रहपूर्वक अगत्य करण्यात भाऊ कुठेही कमी पडले नाहीत. वाई-पाचगणी रस्त्यावरील संस्थेच्या जागेवर काही झोपडपट्टीधारकांनी अनधिकृत रित्या बळकवलेली संस्थेची मोक्याची जागा भाऊंच्या अथक प्रयत्नामुळेच रिकामी होऊ शकली. महाविद्यालयाच्या कामकाजामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण न आणता भाऊंनी सर्वसमावेशक असे धोरण अवलंबले."
आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, "स्वर्गीय भाऊंनी जो आदर्श समाजासमोर ठेवला आहे. तो आदर्श समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचला पाहिजे. यासाठीच आपण या व्याख्यानमालांचे आयोजन करीत आहोत. या वर्षभरात हे कार्य निरंतर चालू राहील."
याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. हणमंतराव कणसे, प्रा. भिमराव पटकुरे,डॉ. चंद्रकांत कांबळे, स्टाफ सेक्रेटरी डॉ.अं बादास सकट, किसन वीर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बाळासाहेब कोकरे तसेच राज्यशास्त्र विभागाचे माजी विभाग प्रमुख प्रा. रमेश डुबल उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्व. प्रतापराव भोसले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ. अंबादास सकट यांनी केले. उपस्थित सर्वांचे आभार प्रा.अर्जुन जाधव यांनी मानले.
या कार्यक्रमाप्रंसगी वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment