कौशल्य प्रशिक्षणातून व्यावसायिक व उद्योजक बना- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.
कौशल्य प्रशिक्षणातून व्यावसायिक व उद्योजक बना- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन.
---------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शशिकांत कुंभार
--------------------------------------------
आयटीआय व कोल्हापूर इंजीनियरिंग असोसिएशनच्यावतीने शिकावू उमेदवारांना निवडपत्रांचे वाटप.
कोल्हापूर, दि. १५: कोल्हापुरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच आयटीआय ही एक नामांकित कौशल्य विकास संस्था आहे. या कौशल्य प्रशिक्षणातून स्वतः व्यावसायिक आणि उद्योजक बना, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाच्या माध्यमातून स्वतःचा व्यवसाय सुरु करा. अडीअडचणी आल्यास मला भेटा. मी तुमच्या मागे उभा आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
कोल्हापुरात जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयटीआय व कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनच्यावतीने आयोजित १२० शिकावू उमेदवारांना निवडपत्र वाटप कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. तांत्रिक शिक्षण पूर्ण झालेल्या शिकाऊ उमेदवारांना पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते १२० जणांना निवडपत्रांचे वाटप झाले.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ७५ हजार नोकर भरती होऊन एक लाख नोकर भरतीचे राज्य शासनाचे उद्दिष्ट आहे. राज्य सरकारने नुकतीच युवा कौशल्य प्रशिक्षण विद्यावेतन योजना लागू केली आहे. यामध्ये आयटीआय व तंत्रशिक्षणातील पदविका झालेल्यांना दरमहा सहा हजार तर पदवीधर व पदव्युत्तरांसाठी दरमहा दहा हजार मानधन आहे.
हा सर्वोत्तम व्यवसाय......!
श्री. मुश्रीफ म्हणाले, औद्योगिक व तांत्रिक प्रशिक्षणाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभे राहून उद्योग व्यवसाय सुरु करा. महाराष्ट्र शासनाकडून मदत व सहकार्य मिळेल. सद्यस्थितीत हा सर्वोत्तम व्यवसाय आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वाय. बी. पाटील, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाळासो कोंडेकर, औद्योगिक शिक्षण संस्था कोल्हापूरचे प्राचार्य महेश आवटे, सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार महावीर बहिरशेठ, आयटीआयचे संस्था व्यवस्थापन अध्यक्ष संग्राम पाटील, भास्कर घोरपडे, संगीता खंदारे, अपूर्वा तेली, सतीश माने, राज येडके, मानसिंग भोसले, श्रावण निर्मळे यांच्यासह इतर मान्यवर शिकाऊ उमेदवार उपस्थित होते.
****
Comments
Post a Comment