प्रतापराव भाऊंच्या स्मरणार्थ ग्रंथालयास पन्नास हजारांची ग्रंथसंपदा प्रदान.
प्रतापराव भाऊंच्या स्मरणार्थ ग्रंथालयास पन्नास हजारांची ग्रंथसंपदा प्रदान.
---------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------------
भुईंज : ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या सारखे सत्शील, सुसंस्कृत आणि निर्मळ नेतृत्व दुर्मिळ असंच होते. त्यांच्या जाण्याने झालेली हाणी कधीच भरून येणार नसली तरी त्यांच्या स्मृती चिरंतन राहण्यासाठी जे जे करता येईल ते ते करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही भुईंज गावचे सरपंच विजय वेळे यांनी भुईंज येथे बोलताना दिली.
सरपंच, आमदार, मंत्री, खासदार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पद भुषवलेले ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्ताने भुईंज ग्रामपंचायतीच्या वतीने ५० हजार रुपये किमतीची ग्रंथसंपदा आझाद मोफत वाचनालयाच्या राजेश स्वामी ग्रंथालयास भेट दिली. त्याप्रसंगी सरपंच वेळे बोलत होते. या ग्रंथ संपदेत स्पर्धा परीक्षेसह अत्यंत दर्जेदार अशा बालसाहित्याची पुस्तके, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील अनमोल ग्रंथसंपदा तसेच इतर दर्जेदार साहित्यिक पुस्तकांचा समावेश आहे. हा उपक्रम म्हणजे भाऊंना आगळी वेगळी आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी आदरांजली आहे, असेही सरपंच वेळे यांनी सांगून यापुढे देखील अशा विविध उपक्रमांतून त्यांच्या स्मृती जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी माजी आमदार मदनदादा भोसले, डॉ. सौ. नीलिमा भोसले, मोहन भोसले, सौ. अंजली भोसले, गजानन भोसले, सौ. अनुराधा भोसले, विश्वासराव पाटील, सौ. पद्मादेवी पाटील, सर्व भोसले कुटुंबिय, त्यांचे नातेवाईक, विविध मान्यवर, भुईंज ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रंथपाल रेश्मा कानिफनाथ जाधव यांनी आभार मानले.
--------------------
चौकट
_____________
"शेकडो किलोमीटर दूरवरून धावली भाऊंची लेकरं"
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या निधनानंतर भोसले कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी महाराष्ट्रभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर भुईंज येथे येत आहेत. या भेटीत भाऊंच्या कर्तृत्वाच्या, दातृत्वाच्या आठवणींना उजाळा मिळत आहे. या सर्व भेटीत एक भेट उजळली ती म्हणजे मराठवाडा, विदर्भातून आलेल्या विद्यार्थ्यांनी घेतलेली सांत्वन भेट. प्रतापराव भोसले यांनी वाई येथे किसन वीर महाविद्यालय परिसरात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या लेकरांसाठी पूर्णपणे मोफत शिक्षण व संपूर्ण मोफत वसतिगृह उभारले. या वसतिगृहातील माजी विद्यार्थ्यांना भाऊ गेल्याचे समजल्यानंतर बुलढाणा, नांदेड, बीड, जळगाव, छ. संभाजीनगर, सोलापूर, लातूर आदी ठिकाणच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत भुईंजला धाव घेतली. त्यांनी जेव्हा त्यांच्या अनुभवातले भाऊ सांगितले तेव्हा सारेच हेलावून गेले. शेकडो किलोमीटर दुरहून आलेल्या भाऊंच्या या लेकरांची ही सांत्वन भेट भाऊंचे मोठेपण अधोरेखित करणारी होती.
___________
फोटो ओळी
ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांच्या स्मृत्यर्थ ग्रंथालयास ग्रंथसंपदा प्रदान करताना मान्यवर
Comments
Post a Comment