किसन वीर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.
किसन वीर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात संपन्न.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
---------------------------------
वाई : येथील जनता शिक्षण संस्थेच्या किसन वीर महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन ग्रंथदिंडी, पुस्तक व भित्तीपत्रक प्रदर्शन, तसेच विशेष व्याख्यान अशा उपक्रमांनी उत्साहात संपन्न करण्यात आला.
“मराठी भाषा हे आपले सांस्कृतिक वैभव असून तिचे जतन, संवर्धन आणि विकास करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे”, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे विद्याव्यासंगी सहायक सरोजकुमार मिठारी यांनी केले.
येथील किसन वीर महाविद्यालयातील मराठी विभाग, ग्रंथालय विभाग आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. डॉ. सुनील सावंत, प्रा. डॉ. ज्ञानदेव झांबरे, प्रा. डॉ. विनोद वीर, मराठी विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत कांबळे, डॉ . धनंजय निंबाळकर, डॉ. संग्राम थोरात, ग्रंथपाल डॉ. शिवाजी कांबळे, पर्यवेक्षक प्रा. बाळासाहेब कोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. मिठारी म्हणाले, ‘प्राचीन राजसत्ता, संतसाहित्य, मराठेशाही ते स्वातंत्र्यचळवळ असा मराठीचा साहित्यप्रवाह कायम राहिला आहे आणि आधुनिक काळातील आव्हाने पेलण्याचे सामर्थ्यही मराठी भाषेत आहे. मराठी विश्वकोशामुळे मराठी भाषा मौलिक आणि संपन्न ज्ञानभाषा म्हणून स्वयंसिद्ध झाली आहे. कोणतीही भाषानिर्मिती आणि विकास हे अनेक शतकांचे सामाजिक देणे असते आणि ते सर्वांनी जतन करायला हवे.”
प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले, “मराठी भाषेचा गौरव म्हणजे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव असून मायभाषेचा आत्मसन्मान राखणे आपले कर्तव्य आहे. अन्य भाषांच्या तुलनेमुळेच मराठीचे श्रेष्ठत्व ठरते, त्यामुळे सर्व भाषा, बोली यांच्याबद्दल आदर ठेवायला हवा.”
सुरुवातीला महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून ते ग्रंथालयापर्यंत टाळमृदंगाच्या गजरात ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे यांच्या हस्ते, तर विद्यार्थ्यांनी साकारलेल्या ग्रंथालयातील भित्तिपत्रकांचे व पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन सरोजकुमार मिठारी यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यानाच्या सुरुवातीला कर्मचारी श्री. अनिल लाखे यांनी गायलेल्या कुसुमाग्रज यांच्या 'गर्जा जयजयकार' या कवितेला श्रोत्यांनी दाद दिली. अमृतवाडी गावचे ज्येष्ठ कवी शशिकांत पार्टे यांच्या कोकणी बोलीतील सादरीकरणासही श्रोत्यांनी दाद दिली.
प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत कांबळे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. संग्राम थोरात यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. सुमती कांबळे यांनी केले, तर डॉ. धनंजय निंबाळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमोल कवडे, जितेंद्र चव्हाण यांनी प्रयत्न केले. यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक वृंद, कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment