म्हाते ते वेळे रस्त्याचे नित्कृष्ट काम नागरिकांनी पाडले बंद.
म्हाते ते वेळे रस्त्याचे नित्कृष्ट काम नागरिकांनी पाडले बंद.
----------------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
चंद्रशेखर जाधव
---------------------------------------
नित्कृष्ठ कामामुळे वेण्णा दक्षिण भागातील जनता आक्रमक.
मेढा,ता.२९: म्हाते ते वेळे या गेल्या अनेक वर्षांपासून खराब असलेल्या रस्त्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू असून हे काम अत्यंत नित्कृष्ठ पद्धतीने होत आहे. या सुरू असलेल्या नित्कृष्ठ कामावर आक्षेप घेत वेण्णा दक्षिण भागातील नागरिकांनी हे काम बंद पाडले आहे. हे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याने तसेच कामाची गुणवत्ता एकदम खराब असल्याने या रस्त्याच्या परिसरातील नागरिक या कामविरुद्ध चांगलेच आक्रमक झाले आहेत.
मेढा शहराला व जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सातारा शहराला वेण्णा दक्षिण भाग जोडण्यासाठी असलेला म्हाते ते वेळे हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून खराब झाला होता. या रस्त्याला बहुतांश ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले होते. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत होता.
सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम सुद्धा अत्यंत नित्कृष्ठ दर्जाचे होत असल्याबाबतच्या तक्रारी वेण्णा दक्षिण भागातील शेकडो नागरिकांनी केल्या आहेत. या कामात रस्ता मजबुतीकरण, खडीकरण, डांबरीकरण इत्यादी कामे समाविष्ट आहेत. मात्र ही कामे होत असताना रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या दृष्टीने पहिला रस्ता उकरून त्यावर जाड खडी, मुरूम टाकणे अपेक्षित असताना काही ठिकाणी रस्ता न उकरताच खडीकरणाचे काम सुरू आहे. तसेच खडीकरण करत असताना डांबराचा वापर अत्यंत कमी प्रमाणात होत असून यामुळे झालेले खडीकरणाचे काम लगेचच उखडत आहे. तर अनेक ठिकाणी डांबर न टाकताच खडी टाकल्याने टाकलेली खडी अगदी सहजपणे निघून जात आहे. याचबरोबर रस्त्याच्या साईडपट्ट्यांची कामे सुद्धा नित्कृष्ठ पद्धतीने होत असून साईडपट्टीला मुरूम टाकण्याऐवजी मातीचे प्रमाण अधिक असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.
रस्त्याच्या याच सुरू असलेल्या नित्कृष्ठ कामाबद्दल वेण्णा दक्षिण भागातील नागरिकांनी एकत्र येत कामे व्यवस्थित करण्याबाबतच्या सूचना संबंधित ठेकेदारांना दिल्या होत्या मात्र तरीही त्यांच्या कामात सुधारणा न झाल्याने या परिसरातील नागरिकांनी आज पुन्हा एकत्र येत कामाची पाहणी करून काम नित्कृष्ठता लक्षात येताच काम बंद पाडले आहे.
दरम्यान यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता यांनी घटनास्थळी भेट देत संबंधित ठेकेदाराच्या मुकादमांना रस्ता उखडलेले काम पुन्हा नव्याने करण्याच्या सूचना केल्या आहेत.
चौकट:
आमचा भाग अतिशय ग्रामीण असून या भागात सुरू असलेले रस्त्याचे काम गेल्या १५ ते २० वर्षाच्या कालावधीतच पहिल्यांदाच होत आहे. या रस्त्याचे काम करताना हलगर्जीपणापणा केल्यास आम्ही तो खपवून घेणार नाही. रस्ताचे नित्कृष्ठ झालेले काम लवकरात लवकर पुन्हा पूर्ण करावे..
-- अंकुश कदम
उपाध्यक्ष, स्वराज्य पक्ष महाराष्ट्र राज्य
फोटो: बालदारवाडी: रस्ताच्या नित्कृष्ठ कामाची पाहणीसाठी जमलेले वेण्णा दक्षिण भागातील नागरीक...
Comments
Post a Comment