महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रॅगिंग कायदा समजून घेणे आवश्यक आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी रॅगिंग कायदा समजून घेणे आवश्यक आहे.
-------------------------------------------------------------------
वाई प्रतिनिधी
कमलेश ढेकाणे
------------------------------------------------------------------
रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त होते. महाविद्यालयातील सिनियर विद्यार्थी ज्युनिअर विद्यार्थ्यांवर रॅगिंग करत असतात. त्यांना विनाकारण शारीरिक किंवा मानसिक त्रास देत असतात. महाराष्ट्र शासनाच्या अधिनियम 1999 कलम 6 नुसार रॅगिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई होते असे प्रतिपादन वाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मा. बाळासाहेब भरणे यांनी केले.
येथील किसन वीर महाविद्यालयात रॅगिंग प्रतिबंध समिती व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात 'रॅगिंग कायदा व परिणाम' या विषयावर ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे होते. या प्रसंगी प्रो. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे समन्वयक, अँटी रॅगिंग समिती कॅप्टन डॉ. समीर पवार समन्वयक, राष्ट्रीय छात्र सेना डॉ. मंजुषा इंगवले व डॉ. अंबादास सकट यांची उपस्थिती होती.
रॅगिंग कायदा व परिणाम या विषयावर बोलताना मा. भरणे साहेबांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील रॅगिंगचे अनुभव सांगितले. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी रॅगिंगचे अनेक प्रकार पाहिले व अनुभवल्याचे नमूद केले. रॅगिंगमुळे अनेक विद्यार्थी शिक्षण अपूर्ण सोडून देतात. सर्वसामान्य विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक मुले, मुली टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करतात. अनेकांचे शैक्षणिक आयुष्य उध्वस्त होते. त्यामुळे या कायद्याची माहिती विद्यार्थ्यांना तसेच पालकांना होणे आवश्यक आहे.
मा. भरणे पुढे म्हणाले की, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना रॅगिंगबरोबरच पोक्सो कायदा देखील माहिती असला पाहिजे. सदर कायदा १८ वर्षाखालील मुला-मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी निर्माण केला आहे. वाई शहरामध्ये पोक्सो अंतर्गत अनेक गुन्ह्यांची नोंद होत आहे. अल्पवयीन मुली-मुलांवर अत्याचार झाल्यास सदर पीडितांच्या जबाबावरून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून घेणे बंधनकारक आहे. कुटुंबातील जवळची नाती भ्रष्ट होत चालली असल्याने हा कायदा निर्माण करण्याची गरज भासल्याचे सांगितले. मा. बाळासाहेब भरणे यांनी मोबाईलच्या अती वापरामुळे होणारे दुष्परिणाम देखील विद्यार्थ्यांना सांगितले. ते म्हणाले की सध्या माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. महाविद्यालयीन मुले व मुली सतत मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. मोबाईल हा समाजाचा शत्रू बनत चाललेला आहे. त्यामुळे कुटुंबातील संवाद कमी होत आहे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिवापर टाळावा व अभ्यासाला महत्त्व द्यावे. विद्यार्थ्यांनी मोबाईलच्या विळख्यातून बाहेर पडून ग्रंथालयाशी नाते जोडावे. पुस्तकाशी मैत्री करावी. रोज नियमित पुस्तके वाचावीत. पुस्तकांना आपले मित्र बनवावे. तसेच आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित करून ध्येयप्राप्तीसाठी सतत प्रयत्न करावेत. विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये सकारात्मक बदल घडवणे आवश्यक आहे. जर आपण स्वतः बदललो तर जग बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे म्हणाले की, वाई पोलीस विभाग व महाविद्यालय यांचे अतिशय जवळचे नाते आहे. पोलीस विभाग समाजामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतो. या विभागामुळेच आपण सर्वजण सुरक्षित आहोत. अनेक महाविद्यालयामध्ये रॅगिंगचे प्रमाण वाढत आहेत. रॅगिंगला बळी पडलेले अनेक मुले व मुली नैराशेत जाऊन आपले आयुष्य संपवतात. त्यामुळे या कायद्यासंदर्भात विद्यार्थ्यांना सजग करण्यासाठी समाज, पोलीस विभाग व महाविद्यालयीन प्रशासन नेहमी सतर्क असले पाहिजे.
प्रो. (डॉ.) ज्ञानदेव झांबरे यांनी आपल्या प्रस्तावनेत रॅगिंगचा अर्थ व होणारे परिणाम सांगितले. कॅप्टन डॉ. समीर पवार यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रा. रेशमाबानो मुलानी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर डॉ. मंजुषा इंगवले यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय छात्र सेनेचे कॅडेट व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment