आजचा युवक आणि व्यवसायिक दशा आणि आशा.
आजचा युवक आणि व्यवसायिक दशा आणि आशा.
आजच युवक उच्च शिक्षण घेवून उच्च डिग्री घेत आहे परंतु त्यांनां अपेक्षित असणारी नोकरी आणि पगार मिळत नाही तेथे तेथे अपयश येत आहे . त्यामुळे आजची युवा पिढी चिंताग्रस्त बनत चालली आहे .
ना हाताला काम - ना शेतमालास दाम यामुळे युवकांचे आर्थिक/सामाजिक जीवन नाकाम ! अशीच आजच्या युवकांची दशा झाली आहे .
सद्यस्थितीत देशाची लोकसंख्या वाढत असली तरी झोपडपट्टी पासूनचे सर्वसामान्य लोक पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिक्षण देत आहेत . सध्या शिक्षणाचा प्रस्फोट झाला असला तरी सर्वत्र गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या अभावामुळे सर्वसामान्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत आहे . असे शिक्षण घेवूनही ना घरका ना घाटका अशी अवस्था झाली आहे . बिकट परिस्थितीतून मुलांना शिक्षण देताना देत असताना भविष्यात सुखाचे दोन घास खायला मिळतील असे सामान्य पालकांचे स्वप्न असते .
परंतु आजच्या राजकीय साठमारीत सामान्यांचा भ्रमनिरास झाला असून त्यांचे स्वप्न भंग होत आहे . समाजकल्याणकरी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत व ते वंचित अपेक्षित राहत आहेत .
सर्वसामान्यांच्या मुलांना नोकरी मिळत नाही म्हणून एखादा उद्योग /व्यवसाय करायचा म्हटल्यास त्याला तशी आर्थिक रसद सहज/सुलभ उपलब्ध होत नाही .म्हणजेच हाताला काम मिळत नाही . विशेषतः याची झळ ग्रामीण भागाला अधिक बसत आहे . ज्यांच्याकडे थोडीफार शेती आहे , ते शेतीत राब राब राबून कठोर मेहनतीतून शेतमाल पिकवत आहेत तर त्याला बाजारात योग्य बाजारभाव मिळत नाही . त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील युवक वैफल्यग्रस्त आहेत .सर्वसामान्य कुटुंबातील युवकांना कोणत्याच क्षेत्रात करियर करता येत नाही .
त्यामुळे अशा अस्थिर/विमनस्क जीवन शैलीचा त्यांना उबग आल्याने त्यांना जगणे असह्य झाल्याचे आढळून येत आहे . ते तसे मत समोर व्यक्त करूनही दाखवतात . हे अतिशय गंभीर आहे . त्यांची वये वाढली करियर नाही म्हणून त्यांचे विवाहही जुळून येत नाहीत . हे अंध:कारमय जीवन संपविण्याचा विचार कधी कधी मनात येतो , असे काही युवक बोलतांना दिसतात नव्हे तर काहीनी तो मार्ग स्विकारलेलाही मी पाहिला आहे .
अशा या अत्यंत गंभीर अन् संवेदनशील बाबीचा समाजाने व शासनानेही तेवढ्याच तीव्र आणि आपुलकीच्या दृष्टिकोनातून विचार करून दखल घेतली पाहिजे असे वाटते !
Comments
Post a Comment