असा मी काय केला गुन्हा.
असा मी काय केला गुन्हा.
-----------------------------------फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
भणंग प्रतिनिधी
शेखर जाधव
-----------------------------------
कालपर्यंत अगदी मानवाच्या, पशु पक्ष्यांच्या,सेवा करत असल्याच्या, आणि सेवाववृत्तीने जगण्याच्या अविर्भावात आम्ही जगत होतो. मनात क्षणभर सुद्धा हा विचार आला नव्हता कि आज आमचा या दुनियेतला शेवटचा दिवस असेल. नेहमीप्रमाणे हसत खेळत, वाऱ्यावर झुलत, जवळ असणाऱ्यांची मधूनच गळाभेट घेत तर कधी आजूबाजूच्यांना मुद्दाम धक्का देत आमचं सगळं जीवन जगणं चालू असायचं. पण _काळ आमच्यावर घात करू लागला अन माझ्यावर अन माझ्या शेजाऱ्यांवर माणूस नावाच्या एका घातक प्राण्याने वार करायला सुरवात केली. कोणी कुऱ्हाडीने वार केले तर कोणी कोयत्याने वार केले, काहींनी तर आमच्यावर धारदार कटरच चालवला._ साधी जखम झाली तर सहन करणं अवघड होऊन बसत तिथं आमच्या मानगुटीवर सरळ सरळ कटर रुपी सुरीच या मानवानं चालवली होती. वेदना तर असह्य होत्या, काळीज तुटत होत पण तुटून तरी काय उपयोग होणार होता कारण त्या काळजाची धडधड पण काही क्षणातच बंद होणार होती. आमच्या मानगुटीवर जरी करवत चालणार असला तरी त्यापेक्षा दुःख मात्र आमच्या भावंडांवर चाललेला करवत पाहून होत होतं. त्यांचे वाहत असणारे अश्रू पाहून मन सुन्न होत होत.त्यावेळी अस वाटत होत कि त्यांच्या आधी आमच्यावर करवत चालावा कारण त्या धाय मोकलून रडणाऱ्या भावंडांच दुःख आम्हाला पाहवत नव्हतं. त्यांच्या आधी आमचा अंत झालेला आम्हाला सहन होणारा होता. कारण आमच्यात माणुसकी अजून जिवंत होती. आम्ही सगळं आयुष्य हे निसर्गातल्या सर्व घटकांच्या सेवेसाठी घालवत असतो मात्र आमचं जीवन हि दुनिया कधी संपावेल याचा काही भरोसा नसतो. आज दुनिया विकासाच्या दिशेने पाऊले टाकतं चालली आहे. पण अशात सर्वात मोठा बळी आमचाच दिला जातो. का तर आम्ही तुमच्या सगळ्या विकासाच्या कामाच्या मध्ये येतो ना. तुम्हाला घर बांधायचं असेल तरी आम्ही मध्ये आहे अस तुम्हाला वाटतं, प्रवासासाठी रस्ते तयार करताना तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात मानवाला अडथळे निर्माण करतो, शेतीसाठी जमीन तयार करायला आम्ही मध्ये येतो, विजेच्या तारांना पण आम्हीच मध्ये येतो एवढंच नव्हे तर अजून किती गोष्टींना आम्ही मध्ये येतो. आमचा थोडा अडथळा निर्माण झाला कि लगेच आमची कत्तल केली जाते. अरे पण निर्दयी माणसा तुला हे कस समजत नाही कि आम्ही आहोत म्हणून सगळी सजीव सृष्टी तग धरून आहे. तू आमच्यावर इतका आघात करतोस पण तेव्हा आम्ही कधी म्हणलंय का कि या माणसाने त्रास दिलाय याला सावली, वारा, फळ,फुल नाही द्यायचं. आम्ही अस म्हणलं नाही आणि म्हणणार पण नाही कारण आम्ही इतके स्वार्थी नाही.
तू आम्हाला इतका त्रास दिलास पण आम्ही नाही केली कधी कुठं तक्रार तुझी..
आमच्या खूप भावंडाना तू नष्ट केलंस आता त्याचेच परिणाम तू भोगतोयस. आता तुला ना शेतीला पाणी राहिलय,ना प्यायला. विहिरी आटल्या, बोरवेल आटल्या.. जिथं पाऊसच नाही पडणार तिथं कुठून विहिरींना पाणी येणार. आम्हाला तोडून पावसाचं प्रमाण कमी करतोस, आम्हाला तोडून जमिनीची धूप करतोस मग पाऊस पडणार कुठून आणि पडला तरी पाणी जमिनीत जिरणार कुठून..
हे माणसा आता तरी सुधार स्वतःला आता तरी आमचा जीव घ्यायचा थांबव, आता तरी आमचं संगोपन कर, आता तरी आमच्यासारखी महाकाय झाड घडव, आता तरी वाहणारं पाणी अडवून त्याला जमिनीत जिरवं.
नाहीतर नाश हा निश्चित आहे..
धन्यवाद,
एक दुर्दैवी झाडं..
मित्रांनो,
आपला जसा जीव आहे तसाच या पृथ्वीतलावावर जगणाऱ्याचा पण जीव आहे. त्यामुळं त्यांना वाचवणं सुद्धा आपलीच जबाबदारी आहे..
झाडं लावा त्याच संगोपन करा. वणवे लावू नका, पावसाचं पडणारं पाणी अडवून जमिनीत मुरवा..
जलसंधारण, वृक्ष लागवड आणि संवर्धनासाठी एकत्र या..
धन्यवाद,
विश्वनाथ डिगे
७६२००१८६८७
Comments
Post a Comment