घरालागत कुत्र्यासाठी लावलेल्या फसात अडकला बिबट्या ; पाटणवाडा येथील घटना.

 घरालागत कुत्र्यासाठी लावलेल्या फसात अडकला बिबट्या ; पाटणवाडा येथील घटना.

--------------------------------------------------------------
रविकुमार येमुर्ला
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
-------------------------------------------------------------

सिरोंचा :- आरमोरी वनपरिक्षेत्रातील वैरागड बीटअंतर्गत पाटणवाडा या गावात कोंबड्यांवर डल्ला मारणाऱ्या श्वानाला पकडण्यासाठी तारांचा फास लावला होता. त्यात एक बिबट्या अडकल्याची घटना बुधवारी (दि.२८) सकाळी उघडकीस आली. ४ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर वनविभागाच्या चमूने बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात अडकवून त्याला फासातून मुक्त केले. विशेष म्हणजे हा फास बिबट्याच्या गळ्याऐवजी कमरेला लागल्याने बिबट्याचे प्राण वाचू शकले.

प्राप्त माहितीनुसार, गेल्या आठ दिवसांपासून पाटणवाडा येथील सिद्धार्थ सहारे यांच्या घरामागे राहणाऱ्या कोंबड्या रात्री गायब होत होत्या. त्या कोंबड्यांची शिकार गावातील बेवारस श्वान करीत असावेत म्हणून त्यांनी श्वानाला अडकविण्यासाठी तारांचा फास लावला. पण त्या तारांच्या मजबूत फासात बिबट्या अडकला. सहसा तो फास गळ्याभोवती आवळल्या जातो. पण बिबट्याच्या कमरेला फास लागला. ही बाब सकाळी लक्षात येताच सहारे यांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिली.

वैरागड येथील क्षेत्र सहाय्यक एच.बी. सोनुले, वनरक्षक विकास शिवणकर यांनी घटनास्थळ गाठले आणि आरमोरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम. बी. मेश्राम यांना याबाबत माहिती दिली. मेश्राम यांनी वरिष्ठांमार्फत ताडोबा (जि.चंद्रपूर) येथील रेस्क्यू चमुला पाचारण केले. डॉ.रविकांत खोब्रागडे आणि शूटर अजय मराठे यांच्या नेतृत्वात या चमुने पाटणवाडा येथे पोहोचून ४ तासांच्या कसरतीनंतर बिबट्याला पिंजऱ्यात बंद करण्यात यश मिळविले.फास कुत्र्यासाठी की बिबट्यासाठीच?

मागील १५ दिवसांपासून पाटणवाडा परिसरात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा होती. संध्याकाळी ६ वाजतानंतर वैरागड ते कढोली मार्गाने प्रवास करणाऱ्या अनेकांना हा बिबट्या पाटणवाडा परिसरात आढळून आला आहे. कोंबड्यांवर ताव मारणारा हाच बिबट्या असावा याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा फास श्वानासाठी लावल्याचे सांगितले जात असले तरी तो प्रत्यक्षात बिबट्यासाठीच तर लावला नव्हता ना? अशी शंका व्यक्त केली जात आहे. हा फास बिबट्याच्या कमरेऐवजी गळ्यात अडकला असता तर बिबट्याचा श्वास गुदमरून त्याचा मृत्यू होण्याची शक्यताही निर्माण झाली असती.

Comments

Popular posts from this blog

गांधीनगर मध्ये युवकांचा धारधार शस्त्राने निघृण खून.

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.