Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

गांधीनगर मुख्य रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरीत्या जबाबदारी असणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्याची गरज.मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार केंव्हा

गांधीनगर मुख्य रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी संयुक्तरीत्या जबाबदारी असणाऱ्या संबंधितावर कारवाई करण्याची गरज.मुख्य रस्ता मोकळा श्वास घेणार  केंव्हा!

------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------

तावडे हॉटेल ते चिंचवड रेल्वे फाटक या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे  नियमित रस्त्याची रुंदीच गायब झाली आहे. त्यामुळे मेन रोडला अतिक्रमणाचा विळखा घट्ट होत चालला असून वाहतूकीची कोंडी, छोटे-मोठे अपघात, या समस्या सारख्या तोंड वर काढत आहेत. रस्त्यावर अतिक्रमण  आणि वाहतुकीस जबाबदार असणाऱ्या घटकावर सार्वजनिक बांधकाम विभाग  कारवाई  केव्हा करणार असा प्रश्न स्थानिक नागरिक आणि वाहनधारकातून विचारला जात आहे.

  मुळात या मुख्य रस्त्याची रुंदी साठ फूट असतानाही काही ठिकाणी ती अतिक्रमणामुळे पंचवीस फुटावर आली आहे. रस्त्याच्या दुतर्फा पानटपऱ्या, चहा गाड्या, व्यावसायिकांचे  डिजिटल फलक, फास्टफूड सेंटर, काही दुकानदारांच्या पायऱ्या, कठडे, कंपाऊंड,  अशा विविध बाबींनी हा रस्ता गिळंकृत केला आहे. गांधीनगर व्यापारी पेठेचे उलाढाल ही दररोज कोट्यवधी रुपये आहे. दररोज शेकडो वाहने, हजारो ग्राहक, या व्यापारी पेठेत खरेदी विक्रीसाठी येत असतात. पण मुख्य रस्त्याच्या अतिक्रमणामुळे त्यांना वाहतूक कोंडी , पार्किंग व्यवस्था नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मुख्य रस्त्याची रुंदी कमी झाल्याने ग्राहकवर्ग रस्त्यावर गाडी पार्किंग करून खरेदी करत असल्याचे वास्तव आहे. मुख्य रस्त्यावरील काही व्यावसायिकांचे बेशिस्त पार्किंग, यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागात मुख्य रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी काही सामाजिक संघटना, आरटीआय कार्यकर्ते, यांनी वेळोवेळी मागणीही केली आहे.   

पण सार्वजनिक बांधकाम विभागाने मात्र जुजबी कारवाई करून वेळ मारून नेण्याचे तोंडाला पाणे पुसण्याचे  काम केले आहे. अतिक्रमणधारक कारवाईवेळी पान टपऱ्या, डिजिटल फलक, चहा गाड्या काढून पुन्हा अतिक्रमण करणार नाही अशी ग्वाही संबंधित प्रशासनाला दिली जाते. पण कारवाईचा फार्स संपल्यानंतर मात्र परिस्थिती ये रे माझ्या मागल्या सारखी राहते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने गुदमरत चालेल्या या मुख्य रस्त्याला मोकळी वाट केव्हा करून देणार तसेच मुख्य रस्ता केव्हा अतिक्रमणमुक्त होणार  असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. सार्वजनिक बांधकाम आणि पोलीस प्रशासन या दोन्ही शासकीय यंत्रणांनी  समन्वय साधून या रस्त्यावरील अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडीस जबाबदार असणाऱ्यावर कडक कारवाई करून कायमस्वरूपी हा मुख्य रस्ता वाहतुकीस सोयीस्कर करण्याची गरज आहे.

    मुख्य रस्त्याच्या दुतर्फा  झालेल्या अतिक्रमित बांधकामावर कारवाईची मोहीम लवकरच राबविण्यात येणार आहे. वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कारवाईची मोहीम सुरू असते पण तरीही काहींनी अतिक्रमण केले आहे. त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल.

महेश कांझर:-उप अभियंता सार्वजनिक बांधकाम  करवीर विभाग


मुख्य रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग, वर गांधीनगर पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे सामान्य जनतेच्या अपेक्षा 

Post a Comment

0 Comments